Monthly Archives: September 2023

Alliterations in Marathi

 घाई घाई घाई——-

 

खोताच्या वाडीत एक खानावळ होती, तिथे मालकाने भिंतीवार एक पाटी लावली होती “घाईला पण वेळ लागतो”. पण मराठी माणसाला कुठला धीर ! तो सारखा घाई गडबडीत असतो. त्याची ही लगबग त्याच्या भाषेत उतरलेली दिसते. माझी एक मैत्रीण होती. ती आपली सकाळची घाई नेहमी सांगे. ती महणायची, ‘ अगं सकाळी मी उठले आणि भराभर कामाला लागले. आठ वाज़ता बाई आली मी चटकन उठून दार उघडलं. तिला म्हण्टलं, भरकन आधी  भांडी घासून घे पाहू. मी इथे हातासरशी पीठ मळून घेतलं, झरझर पोळ्या लाटून टाकल्या. मग मुलांना उठवलं. मह्णट्लं पटापटा आवरून घ्या. पटकन  तुम्हाला बसपाशी सोडून येते. अगं ही मुलं रेंगाळत होती, त्यांना म्हण्टलं चटाचटा पावलं उचला नाही तर बस निघून ज़ाईल.’ हे रोज़चं होतं तिच. दिवस अशा घाई गर्दीत उडून जायचा.

 मराठी माणसाला राग हि चटकन येतो, तो तो भडाभडा बोलून हि दाखवतो आणि नंतर तडकाफडकी नातं हि तोडून टाकतो. किती ही घाई सर्व गोष्टींची. पटपट, पटापटा, भरभर,भराभरा, चटचट, चटाचटा, तसेच पटकन,चटकन, भर्रकन, खर्रकन, मटकन, खाडकन , ताडकन, भडाभडा ,भाडभाड, धाडधाड, धडाधडा असे किती तरी शब्द मराठी माणसाच्या आयुष्यातील गतीमानता दाखवतात. हीच गतीमानता मराठी भाषेच्या प्रगतीत हि दिसली तर किती बहार येईल.

 

पुष्पा पई